*कारभारवाडीला राज्यातील ‘आदर्श वाडी’ बनवणार
* शाश्वत विकासाचे स्वयंपूर्ण खेडे संकल्पना राबवण्यात येणार
कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर: महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून कारभारवाडीची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे. गावकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास घेवून नवनवीन उपक्रम राबवून गावच्या शाश्वत विकासावर भर द्यावा. यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. येथील विविध प्रकल्प महिलांच्या पुढाकाराने होत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. कुक्कुटपालन सारख्या उद्योग निर्मितीलाही चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत कै. शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसहाय्यता गट अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करुन येथील विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कै. शिवा रामा पाटील शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथील सिंचन व्यवस्था, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिटला भेट देवून रसायन विरहित गुळ निर्मितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. महिलांकडून चालवण्यात येणाऱ्या चटणी मशीन, शेवया मशीन, विविध मसाले तयार करणाऱ्या कृषी माल प्रक्रिया मशीनरींची पाहणी करुन महिलांना उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कर्जपुरवठा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कारभारवाडीमध्ये ठिबक सिंचनाने शेतीला पाणीपुरवठा, आंतरपिके, गांडूळ खत निर्मिती, ग्रीन हाऊस, सिंचन सुविधा, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिट, कृषीमाल प्रक्रिया मशिनरी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद, जिरे, धने पावडर, आकाशकंदील बनवणे, विविध प्रकारच्या चटण्या, खाद्यतेल, मसाले, शेवया, पापड तयार करुन बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. या सर्व उद्योगांच्या माध्यमातून कारभारवाडीमध्ये ‘स्वयंपूर्ण खेडे’ संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील यांनी सांगत जिल्हा प्रशासन, कृषी, पणन विभागासह शासनाच्या सर्व विभागांनी गावच्या विकासासाठी सहकार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.