कसबा वाळवे जि. प. सदस्य अरुण जाधव यांचा पत्रकार परिषदेत तळाशी गावातील वादावर खुलासा
कसबा वाळवे (प्रतिनिधी – विनायक जितकर) – तळाशीचे सरपंच बबन जाधव यांनी आपल्यावर प्राण घातक हल्ला केला असल्याचे सांगत माझ्यावर खोटे आरोप करत मला राजकारणात बदनाम करण्याचे कारस्थान करून ते जनतेकडून सहानभूती मिळवत आहेत. त्यांना व साथीदारांना कोणत्याही प्रकारची जखम नाही. त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला कसा? हा तर त्यांनी रचलेला बनाव आहे. असा खुलासा शिवसेनेचे जि.प. सदस्य अरुण मारुती जाधव यांनी तळाशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
अरुण जाधव बोलताना पुढे म्हणाले, सरपंच यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्यावर हल्ला झाला. त्याचा सूत्रधार मी आहे असे खोटे सांगून मला त्यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. उलट त्यांनीच आमच्या गटाच्या शिवाजी कुसाळे व सदाशिव चव्हाण या कार्यकर्त्यावर घरावर हल्ला करून चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर या वाहनांची मोडतोड करून गावात दहशत माजवली आहे. राजकीय सुडातून सामान्य नागरिकांसह आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आमच्या वर कोणतेही गुन्हे नसून तेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकरवी आमच्या कुटुंबातील सदस्यांच्यावर व गटातील प्रमुख व्यक्ती आणि तरुणांच्यावरती खोट्या फिर्यादी दाखल करत आहेत त्यामध्ये न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल. सरपंचांकडून वारंवार ११ कोटी रुपयांचा निधी गावात आणल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात गावात नामदार प्रकाश आबिटकर व माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या निधीतून व माझ्या पाठपुराव्याने गावातील रस्ते विकासासाठी 9 कोटीचा निधी मिळाला आहे. परंतु सरपंच ते आपणच आणला असे भासवतात या मध्ये सरपंचांचा कोणताही पाठ पुरावा नाही. असेेही अरुण जाधव यांनी म्हटले.
सरपंच यांनी तळाशी गावामध्ये केलेल्या विकास कामांचा व 11 कोटी या निधीचा नेमका वापर कुठे झाला, याचा हिशोब जनतेसमोर सादर करावा. विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप आणि प्रसिद्धीचा आधार घेतला जात आहे. गावातील विकास कामांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही. उलट आम्ही केलेल्या विकास कामांमध्ये हरकती घेऊन कामांमध्ये अडचणी निर्माण केेल्या आहेत. त्यांनीच गावातील विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. हे सरपंच स्वतः ठेकेदार असल्यामुळे त्यांनी रस्ते, साकव पूल यासारखी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खोटी कामे कागदावरच केली आहेत. याबद्दल राधानगरी तालुक्यातील काही गावातील लोकांनी यांच्यावर तक्रारी दाखल करून मोर्चे व आंदोलने केली आहेत. सरपंच बबन जाधव यांनी ११ कोटी रुपयांच्या निधीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, नाही तर या सर्व विकासकामांची चौकशी व्हावी आणि गावात पारदर्शक प्रशासन देण्यात यावे, अशी मागणी अरुण जाधव याांनी केली. गत ग्रामपंचायत निवडणूकीत नागरिकांना खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली आहे मात्र “गावाला विकास हवा आहे, नाटक नाही… जनतेला काम हवे आहे, खोटे आरोप नाहीत… सत्य लपवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल,” असे मत अरुण जाधव यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या घटनेबद्दल बोलताना आमच्यावर एस आय टी नेमून याची चौकशी केली जावी असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांनीच आपल्या कार्यकर्त्याच्या भ्रष्ट कारभाराची व मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी अरुण जाधव यांनी केली आहे. यावेळी यशवंत ऱ्हाटोळ, सदाशिव चव्हाण, विजय जाधव, हंबीरराव जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. या पत्रकार परिषदेस अनिल जाधव,वसंत चव्हाण, राजाराम खाडे,सुखदेव पाटील,दिलीप भांदिगरे, हिंदराव पाटील, शामराव पाटील,अरुण खोत,धनाजी कांबळे, विष्णू कांबळे, गणेश कांबळे महादेव कांबळे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.























































