बाल स्केटिंगपटूंच्या स्मृतीज्योतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना अभिवादन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सलग ३९ व्या वर्षी स्मृतीज्योती रॅली; पाच ते सोळा वर्षांच्या बालपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प संस्थापक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सलग ३९ व्या वर्षी मानाच्या स्मृतीज्योती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बाल स्केटिंगपटूंनी शहरातील प्रमुख मार्गावरून स्मृतीज्योत घेऊन जात बापूजींच्या कार्याला आगळ्या पद्धतीने अभिवादन केले.

जुना बुधवार पेठेतील बापूजींच्या निवासस्थानापासून स्मृतीज्योती रॅलीला प्रारंभ झाला. बापूजींच्या स्नुषा श्रीमती इंदिरादेवी साळुंखे, साळुंखे परिवार तसेच श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम यांच्या हस्ते स्मृतीज्योती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर डांगे गल्ली येथे कदम परिवाराच्या वतीने सौ. शारदा भोसले, प्रा. महेश्वरी कदम व सौ. सुप्रभा कदम यांच्या हस्ते स्मृतीज्योतीचे पूजन व औक्षण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून स्केटिंगपटूंच्या सहभागाने ही रॅली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पोहोचली. येथे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे व संस्थेचे सीईओ श्री. कौस्तुभ गावडे यांनी स्मृतीज्योतीस अभिवादन केले.

यानंतर स्मृतीज्योत समाधी परिसरात नेण्यात आली. तेथे बाल स्केटिंगपटूंनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस अभिवादन केले. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, सीबीएसईचे प्राचार्य आसिफ कोतवाल, सौ. नम्रता नार्वेकर व प्रज्योत येजरे यांच्या हस्ते स्मृतीज्योतीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये पाच ते सोळा वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

स्मृतीज्योतीचे संयोजन ॲड. धनश्री कदम, सौ. योगिता घोरपडे, अमित भारमल व भास्कर कदम यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. बापूजींच्या स्मृतींना उजाळा देणारी ही आगळीवेगळी परंपरा गेली ३९ वर्षे अखंडपणे सुरू असून, बाल स्केटिंगपटूंच्या सहभागामुळे यंदाही या उपक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.