महिला सक्षमीकरणासह सामाजिक, शैक्षणिक कार्याला मिळणार नवी दिशा; संचालिका अॅड. वृषाली सावंत यांच्याकडून नियुक्त्या जाहीर
चिपळूणWATCHTEAM : सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कोकणातील गावागावांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सौ. अपेक्षा सूर्यकांत हळदणकर, तर जिल्हा सचिवपदी सौ. श्रद्धा संजोग वाडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला जिल्हास्तरावर अधिक संघटित आणि व्यापक स्वरूप मिळणार आहे.
प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. वृषाली सावंत आणि कु. प्रेरणा सावंत यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. कोकणातील दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक न्याय आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता, स्वखर्चातून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेचे उपक्रम राबविले जात आहेत. अल्पावधीतच अनेक गावांमध्ये संस्थेने आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या सौ. अपेक्षा सूर्यकांत हळदणकर या मूळच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रहिवासी असून त्यांना सामाजिक क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. तर जिल्हा सचिवपदी नियुक्त झालेल्या सौ. श्रद्धा संजोग वाडकर या गुहागरमधील वेळंब रोड परिसरातील रहिवासी आहेत. दोघींनाही संस्थेच्या संचालिका अॅड. वृषाली सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
अॅड. वृषाली सावंत म्हणाल्या की, केवळ सामाजिक जाणिवेतून आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. कोकणातील महिलांना सक्षम करणे, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संपूर्ण कोकणात संस्थेचा विस्तार करून महिलांसाठी अधिक व्यापक आणि भरीव कार्य करण्याचा मानस आहे.
या नियुक्ती कार्यक्रमाला मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले, राजेंद्र गोंजारी, विनोद चिपळूणकर, मस्तकिन चांदशहा, भाई सुर्वे, मिलिंद कदम, संजय वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

























