नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाही; अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यावर भर
कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, ग्रामीण व दुर्गम भागातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकविणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे, या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात ठोस बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यापासून ते शैक्षणिक संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर प्राधान्याने काम केले जाईल, अशी ग्वाही पुणे विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दिली.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दिवाळीनिमित्त हॉटेल अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी सहा वर्षांच्या कार्यकाळातील शैक्षणिक विकासाची दिशा, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतची भूमिका आणि शासनस्तरावर करावयाच्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगून गावडे म्हणाले, शाहू महाराजांनी बहुजन समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थानात क्रांतिकारी निर्णय घेतले. शिक्षणासाठी स्वतःची संपत्ती खर्च करून सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. हाच पुरोगामी विचार पुढे नेत डोंगर-दऱ्यांतील तसेच वाड्या-वस्त्यांमधील मराठी शाळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येईल.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनासह सविस्तर चर्चा केली आहे. राज्यातील सुमारे २६ हजार शिक्षकांच्या पेन्शन प्रश्नावर पर्यायी सूत्र तयार करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न समजून घेऊन ते टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी तीन दिवसांच्या सविस्तर बैठकांचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळणार
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करणे हा आपल्या कामकाजातील महत्त्वाचा प्राधान्यक्रम असेल. शिक्षकांचा अधिकाधिक वेळ अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी वापरला जावा, यासाठी अशैक्षणिक जबाबदाऱ्या बेरोजगार तरुणांकडे सोपविण्याची संकल्पना पुढे आणणार आहे. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळण्याबरोबरच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतील, असे गावडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे नमूद करताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करणे आणि संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण व्हावी, यासाठीही शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
शिक्षण संस्थांना भेडसावणारे प्रलंबित प्रश्न, क्रीडा अनुदान आणि वेतनेतर अनुदान मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी प्रयत्न केले जातील. तसेच तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांच्या अनुभवाला योग्य मान्यता मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण संस्था हे शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. या सर्वांमध्ये समन्वय साधून प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासह शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि शाळांच्या संवर्धनाला प्राधान्य देत शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा निर्धारही आमदार गावडे यांनी व्यक्त केला.
यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अजिंक्य पत्रावळे, विशाल प्रित्यानी, शुभम निंबाळकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























