उद्योग-विद्यापीठ सहकार्यातून ‘मेनन बेअरिंग्ज’सोबतचा कन्सल्टन्सी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण

कोल्हापूर WATCH TEAM: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील नामांकित ‘मेनन बेअरिंग्ज प्रायवेट लिमिटेड’ही एकमेव भारतीयअग्रगण्य कंपनी जी इंजिन बेअरिंग मध्ये उत्पादन करते. या कंपनीसोबत कन्सल्टन्सी प्रकल्प नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा प्रकल्प म्हणजे विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील परस्पर सहकार्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि आश्वासक पाऊल आहे.

हा कन्सल्टन्सी प्रकल्प कंपनीच्या उत्पादनातील एका प्रत्यक्ष तांत्रिक समस्येवर आधारित होता. कंपनीत तयार होणाऱ्या इंजिन बेअरिंग्ज आणि बुश यांच्याविषयी अभ्यास, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट होते. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.विभागातील प्राध्यापकांनी प्रत्यक्ष कंपनीच्या प्लांटला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कंपनीचे तांत्रिक अधिकारी आणि प्राध्यापक यांच्यात सविस्तर चर्चा आणि बैठका पार पडल्या. सखोल संशोधन व आवश्यक त्या वैज्ञानिक चाचण्या पूर्ण करून, विभागाने एक सविस्तर आणि अचूक वैज्ञानिक अहवाल मेनन बेअरिंग्जला पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला आहे.

प्रकल्पाचे स्वरूप प्रयोगशाळाधारित सखोल वैज्ञानिक विश्लेषणाचे होते. बेअरिंग व बुश यांचे नमुने, तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी कच्ची धातू पावडर यांची तुलनात्मक तपासणी करण्यात आली. त्यासाठी विविध अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आला ज्यामध्ये थर्मोग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस व डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलरीमेट्री, फील्ड एमिशन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी व एनर्जी डिस्पर्सिव्ह एक्स-रे विश्लेषण, एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी, एक्स-रे डिफ्रॅक्शन इ. या सर्व चाचण्यांचे निष्कर्ष व शिफारसी सविस्तर अहवालात मांडण्यात आल्या आहेत.

मेनन बेअरिंग्ज ही भारतातील एकमेव आघाडीची इंजिन बेअरिंग कंपनी असून, तिने इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार केलेल्या तीन कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्हीवर सूचीबद्ध असलेला हा स्टॉक आता मिडकॅपमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टॉक्सपैकी एक आहे. तसेच मेनन इंडस्ट्रीज हे औद्योगिक क्षेत्रातील एक अत्यंत विश्वासार्ह आणि नामांकित नाव असून, त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज कंपन्यांशी घनिष्ठ व्यवसायिक संबंध आहे.

ही कंपनी प्रामुख्याने इंजिन आणि व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर्स, इलेक्ट्रिकल व इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आणि निर्यात यांसारख्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते. ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्रात मेनन इंडस्ट्रीज टाटा, महिंद्रा, जॉन डिअर, आयशर, एस्कॉर्ट्स, सोनालिका इंटरनॅशनल, व्ही. एस. टी. टिलर्स अँड ट्रॅक्टर्स, फोर्स मोटर्स आणि टीएमटीएल यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्ससोबत काम करते. तसेच, औद्योगिक आणि तांत्रिक गरजांसाठी ते कमिन्स, आयएफबी, एमर्सन, ग्रीव्हज, नॉर-ब्रेमसे, जीईए, किर्लोस्कर, ऑटोमोटिव्ह ॲक्सल्स लिमिटेड आणि ब्रेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या प्रतिष्ठित उत्पादक कंपन्यांशी जोडलेले आहेत. यासोबतच जागतिक बाजारपेठेतील निर्यातीमध्ये हनीवेल, ॲलिसन ट्रान्समिशन, मॅग्ना, आणि ॲरो इंजिन कंपनी यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा त्यांच्या प्रमुख ग्राहकांमध्ये समावेश होतो. दिग्गज कंपन्यांचा हा मोठा आणि वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग मेनन इंडस्ट्रीजची बाजारातील भक्कम पकड, त्यांच्या उत्पादनांची उच्च गुणवत्ता आणि ऑटोमोबाईल तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान सिद्ध करतो.

मेनन ग्रुप नेहमीच शिवाजी विद्यापीठाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, सामाजिक बांधिलकी जपण्यातही ते सातत्याने अग्रेसर असतात. या यशस्वी प्रकल्पाबद्दल मेनन बेअरिंग्जचे चेअरमन श्री. नितीन मेनन, व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण आराध्य, तसेच श्री. आदित्य मेनन आणि श्री. अंशुल मेनन यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. मेनन ग्रुपचा भौतिकशास्त्र विभाग आणि विभागप्रमुख प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांच्याविषयी नेहमीच विशेष स्नेह राहिला असून, त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याला कंपनीकडून कायमच प्रोत्साहन आणि बळ दिले जाते.

भौतिकशास्त्र विभागाने औद्योगिक क्षेत्राच्या गरजा ओळखून केलेल्या या महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कामगिरीचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) आर. के. कामत यांनी विशेष कौतुक केले आहे. या उपक्रमामुळे विद्यापीठातील संशोधनाला थेट औद्योगिक उपयुक्तता लाभली असून, भविष्यात अशा प्रकल्पांतून उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.