मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंदोलन तापणार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

‘सीपीआर’मधील गैरव्यवभाराविरोधात आंबेडकरवादी संघटना आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आंबेडकरवादी समाज पक्ष संघटना व जनांदोलनाच्या वतीने निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ मागण्यात आली असून, वेळ न मिळाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.

‘सीपीआर’ रुग्णालयाच्या दुरुस्ती आणि रंगकामासाठी २५० कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला असला, तरी या ऐतिहासिक वास्तूची मोडतोड करून मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची मागणी करण्यात आली आहे.

आंबेडकरवादी संघटनांनी निवेदनाद्वारे मांडलेले प्रमुख मुद्दे –

ऐतिहासिक वास्तूची मोडतोड व निधीचा अपव्यय: दुरुस्ती आणि रंगकामाच्या नावाखाली २५० कोटींचा निधी खर्च करून जुन्याच वास्तूचे सुशोभीकरणाचा आव आणून लोकार्पण केले जात आहे. हा निधी रुग्णांच्या थेट वैद्यकीय सेवेसाठी वापरला असता तर आरोग्यव्यवस्थेत सुधारणा झाली असती.

व्यापाऱ्यांवरील कारवाईत भेदभाव: सीपीआर परिसरात मागील ४० वर्षांपासून सेवा देणाऱ्या मागासवर्गीय व अल्पसंख्याक खोकीधारकांना मध्यरात्री जेसीबी लावून हटवण्यात आले, तर दुसरीकडे विशिष्ट उच्चजातीय घटकांना आवारात व्यवसायासाठी जागा दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माजी अधिष्ठात्यांची ‘एसआयटी’ चौकशी करा: अनेक चौकशा सुरू असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना सन्मानाने सेवानिवृत्त करून उपदान देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’द्वारे (SIT) पुनर्रचना करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक व सर्जिकल घोटाळा: वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेठबिगारीप्रमाणे राबवले जात असून, प्रलंबित सर्जिकल घोटाळ्याची नव्याने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बाधित खोकीधारकांचे तातडीने पुनर्वसन: पुनर्वसनाच्या नावाखाली फसवणूक झालेल्या सर्व ४० वर्षे जुन्या खोकीधारकांचे तातडीने योग्य पुनर्वसन करण्यात यावे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आमची भूमिका मांडण्याची संधी न दिल्यास लोकार्पण कार्यक्रमातच ठामपणे निदर्शने करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रसंगी संजय जिरगे, रूपाताई वायदंडे, डॉ. किशोर सडोलीकर, हरी कुर्डूकर, बट्टू भामटेकर, अशोक घाडगे, भगवान कांबळे, बाळाबाई कांबळे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.