गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ जाहीर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संपूर्ण राज्याचे लक्ष गोकुळच्या हायव्होल्टेज निवडणुकीकडे

कोल्हापूर – सहकार क्षेत्रात आणि संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील बैठकीत अखेर सर्व मतभेद बाजूला सारत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे-सावकार, आमदार अमल महाडिक आणि जनसुराज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे महायुतीने गोकुळच्या रणांगणात संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे-सावकार म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुतीची ही बैठक पार पडली. निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने सर्व नेतेमंडळींमध्ये अतिशय सकारात्मक आणि एकसंघपणे चर्चा झाली आहे. मधल्या काळात काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुती एकत्र येणार की नाही, याबद्दल काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आजच्या या यशस्वी बैठकीनंतर सर्व चर्चा आणि उलट-सुलट वावड्यांना पूर्णविराम मिळाला असून, आम्ही महायुती म्हणून पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महायुतीच्या या एकत्रीकरणामुळे जिल्ह्यात नक्कीच अनुकूल चित्र निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी आधीच विरोधी ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ ची घोषणा करून मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता गोकुळ दूध संघाच्या सत्तेच्या चाव्या हस्तगत करण्यासाठी महायुतीची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ विरुद्ध आमदार सतेज पाटील यांची ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ अशी अत्यंत चुरशीची आणि थेट लढत पाहायला मिळणार आहे. या दोन बलाढ्य आघाड्या आमनेसामने आल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या हायव्होल्टेज निवडणुकीकडे लागले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.