|
कोल्हापूर-TEAM WATCH : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणे तसेच भाडेकरारानुसार घरफाळ्याची करआकारणी न केल्याप्रकरणी रंकाळा रोडवरील वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील सात आस्थापनांवर महानगरपालिकेच्या परवाना विभाग व विभागीय कार्यालय क्र. २, छत्रपती शिवाजी मार्केट येथील घरफाळा विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करून ती सील करण्यात आली. या कारवाईदरम्यान बी. एम. एक्स. कापड शोरूमच्या परवान्याबाबत तपासणी सुरू असताना संबंधित दुकानमालकाने दुकान सीलबंद होऊ नये, यासाठी भितीपोटी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुकानाच्या आत डांबून बाहेरून कुलूप लावून निघून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महापालिकेच्या पथकाने तत्काळ कारवाई करून दुकानातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर संबंधित दुकान सीलबंद करण्यात आले. या कारवाईदरम्यान वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील पीटर इंग्लंड कपडे शोरूम, दीपक साडी सेंटर, टेबल ड्रायल लाँड्री, बी. एम. एक्स. कापड दुकान, महालक्ष्मी एक्सक्लुझिव्ह, वेस्टर युनिक आणि लॉरीआय लाँड्री प्रोफेशनल या सात आस्थापनांमध्ये व्यवसाय परवाना नसल्याचे निदर्शनास आले. तसेच भाडेकरारानुसार करआकारणी करण्यात आली नसल्याने संबंधित आस्थापनांवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विनापरवाना व्यावसायिक आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी तसेच आवश्यक भाडेकरार सादर करण्यासाठी यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित आस्थापनांनी नोटिसांनंतरही आवश्यक कार्यवाही केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील घरफाळा थकबाकीदार मिळकतधारक तसेच विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे. |



































































