सावधान… हाेणार तुमच्या व्यवसायाची तपासणी.. आयुक्त डाँ. राजेंद्र भारूड यांचे आदेश- वाचा सविस्तर

हॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची महापालिकेकडून होणार तपासणी

पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत शहरातील हॉटेल्स, लॉजिंग, हॉस्पिटल्स, व्यापारी संकुले तसेच इतर आस्थापनांच्या बांधकामांची आणि पार्किंगच्या जागेची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात येणार आहे. मंजूर बांधकाम नकाशानुसार बांधकाम केले आहे का, तसेच पार्किंगसाठी आरक्षित जागेचा योग्य वापर होत आहे का, याची तपासणी विशेष उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिला आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान संबंधित आस्थापनांच्या मालकांनी महापालिकेकडून मंजूर करून घेतलेला मूळ बांधकाम नकाशा आणि बांधकाम परवानगी प्रमाणपत्र तपासणी अधिकाऱ्यांसमोर सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध करुन ठेवावीत असे आवाहन महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

पार्किंगच्या जागेचा इतर कारणांसाठी वापर केल्यास कारवाई

शहरातील काही आस्थापनांमध्ये मंजूर बांधकाम नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेचा इतर कारणांसाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंजूर नकाशानुसार पार्किंगची जागा खुली ठेवणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान पार्किंग किंवा अन्य जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२ व ५३ अन्वये नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेत हॉटेल चालक, हॉस्पिटल प्रशासन, व्यापारी संकुलांचे मालक आणि इतर आस्थापनांच्या संबंधितांनी महापालिकेला सहकार्य करावे. तपासणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सादर करून नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक, नगररचना विभाग यांनी केले आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.