महावितरणच्या रंगभूमीवर नाट्याविष्काराचा जागर!

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेला पुण्यात सुरुवात; चार प्रादेशिक विभागांतील दर्जेदार नाट्यकृतींची मेजवानी

पुणे-TEAM WATCH : वीजपुरवठ्याची धावपळ. चोवीस तास सेवेसाठी सज्ज राहण्याचे आव्हान. या दैनंदिन व्यापातून वेळ काढत महावितरणचे कर्मचारी रंगभूमीवरही आपली प्रतिभा फुलवत आहेत. त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेला पुण्यात उत्साहात सुरुवात झाली.‘नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा आहे,’ असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात बुधवारी (२१ ऑक्टोबर) स्पर्धेचे उद्घाटन झाले.

वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम आव्हानात्मक असते. अशा धकाधकीच्या दिनक्रमातही त्यांच्यातील कलागुण जपणे महत्त्वाचे आहे. नाट्यस्पर्धा त्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे, असे पवार यांनी सांगितले.नाटकामुळे संवादकौशल्य विकसित होते. वेळेचे नियोजन साधते. सांघिक कामाची जाणीव वाढते. रंगभूमीवर मिळणारी ही सकारात्मक ऊर्जा कार्यालयीन कामातही उपयोगी पडते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते. महावितरणच्या नाट्यकृती व्यावसायिक नाटकांच्या तोडीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणची रंगभूमी सातत्याने प्रगल्भ होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्य अभियंते इब्राहिम मुलाणी, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर, धर्मराज पेठकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य समन्वयक संजय ढोके, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चार नाटके; चार वेगळे विषय

दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चारही प्रादेशिक विभागांतील विजेत्या नाटकांचे सादरीकरण होत आहे. पहिल्या दिवशी कोकण विभागाच्या ‘ओल्या भिंती’ या नाटकाने रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ हे नाटक सादर होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके रंगमंचावर  आहेत.

सामाजिक आणि संवेदनशील विषयांची मांडणी करणाऱ्या या नाट्यकृतींना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वीजसेवेच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच कलेची नाळ जपणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हा रंगोत्सव ठरत आहे.सूत्रसंचालन मृदुला शिवदे आणि भक्ती जोशी यांनी केले. अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.