विनायक जितकर
राधानगरी तालुक्याचा शैक्षणिक दर्जा राज्यामध्ये अव्वल…
सरवडे प्रतिनिधी : राधानगरी तालुक्याचा शैक्षणिक दर्जा राज्यामध्ये अव्वल आहे. हा दर्जा असाच कायम रहाण्यासाठी तालुक्यातील आदर्श शाळांना निधीच्या स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते नरतवडे ता. राधानगरी येथे वनविभाग, ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अरुण जाधव होते.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, प्राथमिक शाळाच्या इमारती या खूप जुन्या असून अनेक शाळामध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पालकांचा खाजगी शाळांकडे कल वाढलेला आहे. यासाठी प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी लक्ष देणार आहे. प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार असून आदर्श शाळांना निधीच्या स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहे. तसेच शासनाच्या अनेक योजना या जनतेसाठी असतात. त्यामुळे या योजना राबविताना शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेशी चर्चा करणे गरजेचे आहे. तरच त्या योजनांची प्रभावी अमलबजावणी होईल. ज्या ठिकाणी कामामध्ये दिरंगाई होईल अशा ठिकाणी संबंधित ठेकेदार किंवा शासकीय कर्मचारी अशावर त्वरीत कारवाई करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी शिक्षण,वन समिती, आणि ग्रामपंचायतीच्या विविध समस्यां मांडल्या. सदर बैठकीस गटविकास अधिकारी संदीप भंडारे माजी उपसभापती अरुण जाधव शिवसेना तालुकाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी चौगुले शिक्षणाधिकारी बी.एम. कासार माळी साहेब उपाभियंता सुरेश खैरे संग्राम पाटील राजेंद्र वाडेकर राजेंद्र पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.