दररोज 14 लाख महिलांची एसटीने सैर! महिनाभरात अर्ध्या तिकिटात चार कोटी महिलांचा प्रवास…
एसटीच्या महिला सन्मान योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून दररोज 14 लाख महिला अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करत आहेत, तर सवलत सुरू झाल्यापासून महिनाभरात तब्बल 4 कोटी 22 लाख महिलांनी एसटीचा प्रवास केला आहे. त्यामुळे महामंडळाच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांची भर पडल्याने ती 55 लाख झाली आहे.
कोरोना महामारीपासून प्रवासी संख्या रोडावल्याने एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटीची प्रवासी संख्या वाढावी म्हणून महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास अशी घोषणा केली आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून एका महिन्यात 4 कोटी 22 लाख महिलांनी प्रवास केला आहे. तसेच महिलांना सवलत जाहीर केल्यापासून एसटीच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान कोल्हापूर विभागात सर्वाधिक प्रवासी वाढले असून 1 महिन्यात तब्बल 30 लाख 24 हजार महिलांनी एसटीचा प्रवास केला आहे.