श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक उत्तम पर्याय उपलब्ध…
गारगोटी प्रतिनिधी – युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी, ता.भुदरगड संचलित नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मंजूरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे की, चालू शैक्षणिक वर्षापासून भुदरगड तालुक्यातील पाल येथे डिग्री इंजिनीअरींग कॉलेज अर्थात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये सिव्हील इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता, कॉम्प्युटर इंजिनीअरींग 120 विद्यार्थी क्षमता, मेकॅनिकल इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता, इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता व आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए.आय) ॲन्ड डाटा सायन्स इंजिनीअरींग 60 विद्यार्थी क्षमता हे अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून यावर्षी पासून बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरील वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.
क्वालिटी एज्युकेशनवर भर… आजवर युवा ग्रामीण विकास संस्थेच्या शैक्षणिक संस्थांच्या वाटचालीत आम्ही क्वालिटी एज्युकेशनवर भर दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये टेक्नीकल एज्युकेशनची गरज ओळखून विद्यार्थी व भविष्याची गरज लक्षात घेता संस्थेमार्फत दर्जेदार शैक्षणिक सोयी-सुविधा देणाऱ्या डिग्री इंजिनीअरींग कॉलेजची सुरवात करत करत आहोत. त्याचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नक्की होईल याची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त करत क्वालिटी एज्युकेशनवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. |
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यासंलग्न असणाऱ्या चंदगड, आजरा, राधानगरी, कागल, गगनबावडा या तालुक्यांमध्ये एकही अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू नाही. वरील तालुक्यामधून 12 वी सायन्स शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. त्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणेसाठी अंदाजे 70 ते 80 कि.मी. लांब जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा इतर शहरांमध्ये जावे लागते. भुदरगड तालुक्यामध्ये 3 व चंदगड तालुक्यामध्ये 1 तंत्रनिकेतन (डिप्लोमा) कॉलेज सुरू असून या तंत्रनिकेतन कॉलेजमधून दरवर्षी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व विद्यार्थींनींना थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी शिक्षणासाठी देखील लांब जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा इतर शहरांमध्ये जावे लागते. यामुळे या तालुक्यातील अनेक होतकरू व गरीब विद्यार्थी व विद्यार्थीनींना आर्थिक अडचणीमुळे अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
प्रशस्त इमारत व निसर्ग संपन्न परीसरामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजकरीता प्रशस्त इमारत बांधण्यात आली असून सदरची इमारत ही निसर्ग संपन्न परिसरात आहे. यामुळे शहरातील सिमेंटच्या जंगलापेक्षा या निसर्ग संपन्न परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अभियांत्रीकी पदवी महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेचे दिवस सुरु असून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळच हक्काचे कॉलेज उपलब्ध झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रवेशासाठी लागणारा वेळ व पैसा यांची मोठी बचत होणार असल्याने श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजच्या माध्यमातून एक उत्तम पर्याय जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे.