*सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला*
*मिळवून देण्यासाठी सर्वांनी आपले काम चोख पार पाडा*
*- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले*
कोल्हापूर, (रुपेश आठवले): एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती असुन 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेवून सामाजिक समता सप्ताहामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख पार पाडा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
राज्य शासनाच्यावतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने दरवर्षी दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज दि. 8 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कोल्हापूर येथे सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन व भारतीय संविधानाची उद्देशिका प्रास्ताविक यांचे सामुहिक वाचन करण्यात आले.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, महाविद्यालय, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासहित इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य, पथनाट्य, स्वच्छता अभियान तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली.
यावेळी कविता गायकवाड, सचिन पाटील, तानाजी पाटील, रोहिणी पिसे, सुप्रिया काळे व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन परब व आभार सचिन पाटील यांनी मानले.