विनायक जितकर
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून निरंतर संशोधन कार्य सुरु…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकानी संशोधित केलेल्या कर्करोग, डेंग्यू, कोरोना आदी आजारांवरील जलद व किफायतशीर दरात निदान करणाऱ्या उपकरणाच्या निर्मितीसाठी पेटंट जाहीर झाले आहे. डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे (रिसर्च डिरेक्टर) यांनी संशोधित केलेल्या ‘बायोसेन्सिसिंग डीव्हाइस फॉर डिटेक्टींग बायो मोलिक्युल्स’ या डिझाइनसाठी हे पेटंट मिळाले असून विद्यापीठाला मिळालेले हे 19 वे पेटंट आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून निरंतर संशोधन कार्य सुरु आहे. संशोधनाबरोबरच तंत्रज्ञान निर्मितीमध्येही विद्यापीठाने पुढचे पाउल टाकले आहे. ‘बायोसेन्सिसिंग डीव्हाइस फॉर डिटेक्टींग बायो मोलिक्युल्स’ साठी मिळालेल्या या पेटंटमुळे कर्करोग, डेंग्यू, कोरोनासारख्या आजारांचे कमीत कामी कालावधीत निदान कारणे शक्य होणार आहे. या चाचणीसाठीचे शुल्कही कमी होणार आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान विकसन व उपकरण निर्मितीच्या माध्यमातून विद्यापीठाला अतिरिक्त उत्पन्न मिळवणे शक्य होणार असल्याचे डॉ. लोखंडे व डॉ. पांडे-तिवारी यांनी सांगितले.
या संदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत मिळालेले हे अकरावे भारतीय पेटंट आहे. याशिवाय 2 कोरियन, 3 ऑस्ट्रेलियन व 1 डिझाइन पेटंट विद्यापीठाने मिळवले आहे. विद्यापीठ प्रशासन आणि संशोधकांच्या दृष्टीने आनंददायी बाब असून त्यामुळे संशोधन कार्याला अधिक गती मिळणार आहे. |
पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभिनंदन केले.