भूसंपादन निधी, प्रलंबित योजनांना गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई – राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण विभागाच्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली .
बैठकीत मृद व जलसंधारण विभागाच्या कोल्हापूर परीक्षेत्रातील विविध योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विशेषतः राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध लघु पाटबंधारे योजनांसाठी आवश्यक भूसंपादन निधी उपलब्ध करून देणे, नव्याने प्रस्तावित योजनांना प्रशासकीय मान्यता देणे तसेच सुरू असलेल्या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे, उपसा जलसिंचन योजनांची सद्यस्थिती, तसेच भूसंपादन देयकांसाठी आवश्यक निधी उपलब्धतेबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे निधी प्राधान्याने आणि तातडीने वितरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत राधानगरी तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव पाल, बनाचीवाडी, साठवण तलाव आपटाळ, कुक्कडवाडी या योजनांबरोबरच भुदरगड तालुक्यातील वासनोली, कारिवडे, मठगाव, चिवाळे, आप्पाचीवाडी, पडखंबे आणि पंडिवरे येथील जलसंधारण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आजरा तालुक्यातील पेरनोली साठवण तलाव आणि देवकांडगाव साठवण तलाव प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीवरही चर्चा झाली.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील जलसंधारण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व जलसंधारणाच्या माध्यमातून शेती समृद्ध करण्यासह ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.























































