नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प जिल्हास्तरीय कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक
कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प जिल्हास्तरीय कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करावे. ऊसाबरोबरच अन्य पिकांच्या रोपवाटिका निर्मितीवरही भर द्यावा. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, लैंगिक छळ प्रतिबंध कायदा अशा महिलांशी संबंधित विविध कायद्यांबाबत बचत गटातील महिलांमध्ये जागृतता करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील 6 लोकसंचलित साधन केंद्रामधील 112 गावातील महिला बचत गटांमधील महिलांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करुन याद्वारे महिलांपर्यंत महत्वपूर्ण व आवश्यक माहिती पोहोचवावी, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
सचिन कांबळे यांनी सादरीकरणाद्वारे माविम मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माविमच्या वतीने ऊस रोपवाटिका, शेळी, मेंढी, दुधाळ गाई, म्हैशी पालन मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती व प्रशिक्षण, परसबाग लागवड मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची विक्री प्रदर्शन, महिला मेळावा, सकस आहाराविषयी जाणीव जागृती, आरोग्य विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आल्याचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी सांगितले.