विनायक जितकर
सीपीआर रुग्णालय सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना हा आपला दवाखाना वाटावा…
कोल्हापूर – संभाव्य पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुसज्ज राहणे गरजेचे आहे. सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना हा आपला दवाखाना वाटावा, असे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे. पूरस्थितीत आरोग्य विषयक आवश्यक उपाययोजनांची, औषध साठ्याची पूर्वतयारी करून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. आज पंचगंगा हॉल, सी.पी.आर रुग्णालय येथे आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडीत विषयांची आढावा बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीच्या सुरवातीस माहिती देताना अधिष्ठाता श्रीमती आरती घोरपडे यांनी, सीपीआर रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरळीत सुरु आहे. याठिकाणी रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले असून, वाढत्या रुग्ण संख्येप्रमाणे रुग्णसेवा गतिमान करण्यात आली आहे. शासनाकडे निधी, यंत्र सामुग्री, रिक्त पदे आदी समस्यांबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले असून, सदर प्रस्ताव मंजुरीकामी शासन स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी क्षीरसागर यांचेकडे केली. |
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर रूग्णालय हे गोरगरीब- सर्वसामान्यांचे रुग्णालय असून, हे रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व्हावे, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करत आहोत. विधीमंडळात प्रश्न मांडण्यापासून आंदोलनापर्यंत अशा अनेक प्रकारे सीपीआर रुग्णालय सुसज्ज करण्याकडे आपला कल राहिला आहे. रुग्णालयासाठी बेड, सिटी स्कॅन सेंटर, ट्रोमा केअर युनिट, सिव्हीसितटी मशीन याद्वारे गोरगरीब रुग्णांना मोफत व माफक दरात सेवा देण्यात यशस्वी ठरलो आहे. नुकतेच मोड्यूलर ओटी मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामावेशक काम करत असून, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक बाबींची पूर्तता येत्या काही दिवसात करण्यासाठी शासन स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासित केले.
यावेळी सीपीआर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी वर्गाकडून रिक्त पदे, अतिरिक्त पद भरती, ऑडीटेरीयम हॉल, रुग्णवाहिका, विद्यार्थी वाहतुकीसाठी बसेस, नर्सिंग कॉलेजसाठीचे उर्वरित २० विभाग कार्यान्वित करणे, इमारतीची डागडुजी, अत्याधुनिक यंत्र, आदी पुरवठा करण्याबाबत मागणी केली. सीपीआर रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीच्या डागडुजी व नूतनीकरणासाठी ४८ कोटींचा निधी येत्या काही दिवसात मंजूर होणार आहे. यासह उर्वरित मागणी प्रस्तावाबाबत पाठपुरावा करून आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास आवश्यक सर्व मदत करण्याची राजेश क्षीरसागर यांनी ग्वाही दिली. यावेळी अधिष्ठाता श्रीमती आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील देशमुख, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, मुख्य प्रवक्ता डॉ. अजित लोकरे, डॉ. अक्षय बाफना, डॉ. राहुल बडे, डॉ.शानबाग, डॉ. बनसोडे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कृष्णा लोंढे, अनिकेत जुगदार, अनिल माने आदी उपस्थित होते.