कन्यादान योजनेमधून 32 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सामाजिक न्याय विभाग व अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट, घोटवडे ता. राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 एप्रिल 2023 रोजी श्री बाळुमामा देवालय, आदमापुर ता. भुदरगड येथे 32 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात झाला, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे व त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. हे प्रकार टाळण्यासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कन्यादान योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती विशाल लोंढे यांनी दिली.
या विवाह सोहळ्यास जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, उपाध्यक्ष अभिषेक अरुण डोंगळे , श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे ता. राधानगरी तसेच समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने गृहपाल प्रकाश नाईक, श्रीमती सविता शिर्के व तालुका समन्वयक सुरेखा डवर, भुदरगड ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकांत शहा व मारुतीराव टिपूगडे तसेच विवाहित जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी नागरिक उपस्थित होते.