मी हिंदुत्व सोडले नाही… सोडणार नाही…
”गाईला सुरक्षितता तुम्ही देऊ इच्छिता द्या; पण त्यापेक्षा जास्त आपल्या आईला द्या. महिलांवर अत्याचार वाढत आहे. अत्याचार झाल्यानंतर महिलेची तक्रार घेतली जात नाही तर गुन्हा दाखल केला जातो. उलट महिलांना लाथा मारल्या जातात. गोमास घेवून जाताना संशय आला तर एखाद्याला चिरले जाते असे पाशवी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असा घणाघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. ते पाचोरा (जि. जळगाव) येथील सभेत आज बोलत होते.
गाय माता, पण बैलांची
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी मग गोव्यात नाही. दुसऱ्या राज्यातही नाही. जर कुठे कुणाला संशय आला की, गोमांस घेवून तो चाललाय याचा संशय आला तर त्याला मारला जातो, चिरला जातो असे पाशवी हिंदुत्व आमचे नाही. ठीक आहे सावरकर म्हणाले, गाय ही माता आहे पण ती माणसांची नाही बैलांची आहे.
महिलांना सुरक्षा नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, आज महिलांवर गुन्हे होत आहेत. त्यांना सुरक्षा दिली जात नाही. ठाण्यात महिलेला मारहाण झाली त्या आमची कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या पोटात लाथा मारल्या. हे तुमचे हिंदुत्व भाजपचे आहे ते आम्हाला मान्य नाही. रोशनी शिंदेंची तक्रार अजूनही घेतली नाही. उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का?
मी हिंदुत्व सोडणारच नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, ते आता शक्यता पडताळून पाहत आहेत. ते पाहताना त्यांचे काय जातेय ते बघायचे नाही ते दुसरे फुटण्याकडे लक्ष देत आहेत. मी काॅंग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर हिंदुत्व सोडले. मी म्हणतो की, तीन वर्षांत मी हिंदुत्व सोडल्याची एकतरी घटना, प्रसंग दाखवा. कोरोनात सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे मी बंद ठेवली होती कोरोनात निर्णय घ्यावा लागला पण ते मंदिर उघडे ठेवा असे म्हणत होते. मी हिंदुत्व सोडले नाही. सोडणार नाही. पण मला शेंडी जाणव्यांचे हिंदुत्व मान्य नाही. भाजपला हिंदुत्व कळत नाही. त्यांच्या हिंदुत्वाला शेंडा, बुड नाही.