*मविप्र क. का. वाघ महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इलेक्ट्रॉनिक सायन्स मध्ये विद्यार्थी शिकणार ‘एआय’!*
*पिंपळगाव बसवंत/नाशिक*: मराठा विद्या प्रसारक (मविप्र) संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक सायन्स या अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा विषय शिकवला जाणार आहे.
या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असून, यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. या अभ्यासक्रमासाठी जागा मर्यादित असून, प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर दिला जाईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश जाधव आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक भगवान कदलाग यांनी दिली. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित 24 जागा असून, अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रा. किरणकुमार जोहरे (इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग) यांच्याशी 9130751051 क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाविद्यालयातर्फे प्राचार्यांनी कळविले आहे.
*एआय हे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठीही उपयुक्त!*
२०२५ हे भारत सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर्ष जाहिर केले आहे. एआय साक्षरता ही भविष्यात जगण्यासाठी प्राणवायू असेल. एआय च्या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनतील आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवू शकतील. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवत आत्मनिर्भर होण्यासाठी महाविद्यालयात एआय वर लवकरच विशेष अभ्यासक्रम राबविणार आहेत. पृथ्वीवरील एक लाख आर्थिक श्रीमंत व्यक्ती आणि ३७ टक्क्यांपेक्षा जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी संबंधित आहेत. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे आणि शिक्षणाधिकारी डॉ. नितीनजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आंतरराष्ट्रीय एआय रिसर्च सेंटर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) सुरेश जाधव यांनी सांगितले.