पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा
जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट असत नाही. परिश्रम आणि अभ्यासाला पर्याय नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला वेगवेगळ्या परिक्षांना सामोरं जावं लागतं. मग ती शालेय परिक्षा असो किंवा जगण्यातील परिक्षा असो. त्याला आत्मविश्वासानं आणि निडरपणानं सामोरं जा, यश तुमच्या सोबत असेल, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज विवेकानंद महाविद्यालयात परीक्षा पे चर्चा हा उपक्रम पार पडला. एक्झाम वॉरियर्स आणि आर्ट कॉम्प्युटेशन या मोटीवेशन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची भावना जागृत केली.
परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना दडपण येतं. परिक्षेच्या ताणतणावातून अनेक विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याच्या दुर्देवी घटना देखील घडल्या आहेत. अशा वेळी देशातील विद्यार्थी सक्षम व्हावेत, त्यांनी परीक्षांना आत्मविश्वासानं सामोरं जावं, या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातील सर्वच खासदारांना आपापल्या मतदार संघात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत, खासदार धनंजय महाडिक, भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या पुढाकारातून आज कोल्हापुरात परीक्षा पे चर्चा आणि एक्झाम वॉरियर्स आर्ट कॉम्प्युटेशन या मोटीवेशन कार्यक्रमाचं, विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजन केलं होतं.
आपल्या आवडीच्या विषयात रस घ्या, अभ्यासाची गोडी लावून घ्या, तरच तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडाल. आणि आत्मविश्वासानं प्रत्येक गोष्टीला सामोरं जात यशस्वी व्हाल, असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केलं.
या कार्यक्रमासाठी आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांची विवेकानंद कॉलेजच्या आवारात गर्दी झाली होती. विवेकानंद कॉलेजचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, खासदार धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक विजय खाडे-पाटील, चित्रकार विजय टिपुगडे, सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे यांच्या उपस्थितीत, दिपप्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रारंभी नववी ते बारावी आणि दिव्यांग विद्यार्थी अशा विविध पाच गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी अरिफ तांबोळी आणि विवेक कवाळे यांनी चित्रकलेची उत्तम प्रात्यक्षिकं सादर केली.
विवेक कवाळेनं पंतप्रधान मोदी आणि अरिफ तांबोळीनं लाल किल्ल्याची प्रतिमा साकारली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम सुरू झाला. डॉ. एस एन जैन, डॉ. एम एस देशमख, डॉ. शिरीष शितोळे, डॉ. कालिदास पाटील, कृष्णराज महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परिक्षेमध्ये येणार्या अडचणी, विद्यार्थ्यांची मानसिकता, ताणतणाव टाळून परिक्षेला सकारात्मक रित्या कसं सामोरं जायचं, यशाचा राजमार्ग काय असतो याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जीवनात यशस्वी होण्यासाठी आईवडील पहिले मार्गदर्शक असतात. शिक्षकांचं दिशादर्शक मार्गदर्शन गरजेचं असतं. त्याही पेक्षा विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर परिक्षेला तोंड देताना तणाव येणार नाही.
दरम्यान चित्रकार अरिफ तांबोळी आणि विवेक कवाळे यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या नववी ते बारावी आणि दिव्यांग गटातील १३ विजेत्यांना खासदार धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, विवेकानंद संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रा. अजय दळवी, विजय टिपुगडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या उपक्रमाचं व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक, विवेकानंद कॉलेजचे एनसीसीचे विद्यार्थी, विश्वराज महाडिक ग्रुप आणि सार्थक क्रिएशनच्या टिमनं उत्कृष्ट नियोजन केलं.
खासदार धनंजय महाडीक यांनी राबविलेला हा उपक्रम खराेखरीच दखल घेण्यासारखा, काैतुकास पात्र असाच आहे. – POSITIVVE WATCH