208 गुन्हे, 200 आरोपी जेरबंद, कोल्हापूरात अवैध दारूविरोधात मोठी मोहीम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली

कोल्हापूर – पुणे जिल्ह्यात मिथेनॉलमिश्रित गावठी दारूच्या सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अवघ्या 12 दिवसांत जिल्ह्यात 208 गुन्हे दाखल करून 200 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 55.45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) तसेच विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. 29 मे ते 10 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 3 हजार 948 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 53 हजार 480 लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले. याशिवाय सुमारे 300 लिटर इतर द्रव पदार्थ आणि 400 किलो अखाद्य गूळ जप्त करण्यात आला.

हातभट्टी दारू निर्मितीचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांना विशेष सूचना दिल्या आहेत. हातभट्टीसाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्यांनाही आरोपी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 93 अन्वये सराईत गुन्हेगारांविरुद्ध 67 प्रस्ताव दाखल करण्यात आले असून सात प्रकरणांमध्ये सात लाख रुपयांची बंधपत्रे घेण्यात आली आहेत.

वीज चोरी करून हातभट्टी चालविणाऱ्यांविरोधात महावितरणला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच माणगाववाडी, मोरेवाडी आणि दानोळी परिसरात वनक्षेत्रातील लाकडाचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींची वन विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि कोतवाल यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. संबंधित जागामालक आणि कच्चा माल पुरवठादारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मिथेनॉलयुक्त विषारी दारूमुळे दृष्टी जाणे, अवयव निकामी होणे तसेच मृत्यूचा धोका निर्माण होत असल्याने जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश शिक्षण, समाजकल्याण विभाग, महाविद्यालये आणि प्रसारमाध्यमांना देण्यात आले आहेत. ग्रामरक्षक दलांच्या माध्यमातून गावपातळीवरही अवैध मद्यनिर्मिती रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अवैध गावठी दारूपासून दूर राहावे तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे. यासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 88888 12345 उपलब्ध करण्यात आला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.