गोकुळ दूध संघात वसुबारसनिमित्त आयोजित गाय-वासरू व म्हैस पूजनप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी.
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने वसुबारसनिमित्त गाय-वासरू व म्हैस पूजन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी सपत्नीक धार्मिक विधीपूर्वक पूजन केले. यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य, संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत वसुबारस सणाला विशेष महत्त्व आहे. पशुधनाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच आपल्या परंपरा जपण्यासाठी गोकुळतर्फे दरवर्षी वसुबारस साजरी केली जाते. दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार आहे. गोकुळमुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीत देशी गायींना विशेष महत्त्व आहे. खिल्लारसारख्या देशी गोवंशाच्या जातींचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. दूध उत्पादकांनी पशुधनाचे आरोग्य, योग्य आहार आणि संगोपनाकडे लक्ष द्यावे. तसेच आधुनिक पशुसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे राज्यातील काही भागांत पाणी व चाऱ्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याला अनुकूल भौगोलिक परिस्थिती तसेच पाणी व चाऱ्याची उपलब्धता लाभली आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, भविष्यात पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी दूध उत्पादकांनी आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर करण्यासाठी शासन, गोकुळ दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. भविष्यातही दूध उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, हणमंत पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.व्ही.डी.पाटील ,डॉ दळवी,धनाजी पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. पी. पाटील यांनी केले.

























