कोल्हापूर- WATCH TEAM : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागल दरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात सुरक्षेचे नियम पूर्णपणे बासनात गुंडाळण्यात आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. निष्काळजीपणामुळे महामार्गावर अपघातसत्र सुरूच असून, नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात दूध संघाच्या एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर कामगारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने सुरक्षा उपाययोजना न राबवल्यास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
|
प्रमुख मागण्या आणि इशारा: |
गोकुळ शिरगाव व कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमधील हजारो कामगार दररोज याच मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करतात. उजळाईवाडी ते कागल दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आणि विस्कळीत अवस्थेत आहेत. योग्य दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर्स, गतिरोधक आणि वाहतूक नियंत्रक (ट्रॅफिक वार्डन्स) नसल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आयटक संलग्न कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कार्यालयात जाऊन प्रकल्प संचालकांना थेट निवेदन सुपूर्द केले. “प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणखी किती निर्दोष कामगारांचे बळी घेणार?” असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरू, असा थेट इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला आणि वाहतूक कोंडीला सर्वस्वी NHAI प्रशासनच जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कामगार संघटनेचे यावेळी लक्ष्मण पाटील, शाहीर सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, संभाजी शेलार, दत्तात्रय बच्चे, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रविण करडे, विजयकुमार कांबळे आणि वैशव पाटील तसेचपदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.












































































