नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्याबरोबरच बाजाराभिमुख कृषी उत्पादनाला व विपणनाला चालना देणाचा उद्देश
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कृषी क्षेत्रात प्रगतशील जिल्हा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्याबरोबरच बाजाराभिमुख कृषी उत्पादनाला व विपणनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला. या महोत्सवात विविध भागांतील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट सहभागी झाले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधलेले शेतकरी, नागरिकांच्या यशस्वी वाटचालीच्या यशोगाथा थोडक्यात..
कृषी विभागाच्या माध्यमातून राशिवडे बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात खूप उत्कृष्ट पद्धतीने कृषी महोत्सव घेण्यात आला. याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना निश्चित होईल, असे मत राशिवडे गावचे आनंदा शिंदे यांनी व्यक्त केले. पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील कृषीभूषण सर्जेराव आप्पा पाटील यांनी 25 एकर शेतीमध्ये उन्हाळी नाचणीचा नाविन्यपुर्ण प्रयोग राबविला आहे. यातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.
गगनबावडा येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रिया योजनेतून महिला बचत गटामार्फत करवंदापासून सरबत निर्मिती व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या उद्योगामुळे गगनबावडा सारख्या डोंगराळ भागातील महिलांना रोजगार निर्मिती झाली असल्याची माहिती गगनगिरी येथील शारदा संजय पाटील यांनी दिली.
भुदरगड तालुक्यातील पाटगांवची ओळख आता ‘मधाचे गाव पाटगांव’ अशी निर्माण झाली आहे. आमदार प्रकाश आबीटकर व जिल्हाधिकारी रेखावार यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या या उपक्रमामुळे गावातील मध उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडत असल्याची माहिती भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली चे मध उत्पादक शेतकरी धर्माजी महादेव कांबळे यांनी दिली.
चंदगड तालुक्यातील नागणवाडीचे राघवेंद्र हरी व्हटकर यांनी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेतून हरिलक्ष्मी एंटरप्रायजेस यानावाने नाचणी प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. या उद्योगाव्दारे राज्यात तसेच परदेशात देखील उत्तम प्रतिची नाचणी विक्री ते करत आहेत. सुरुवातीला 7 ते 8 लाख रुपयांच्या भांडवलातून सुरु केलेल्या व्यवसायाची सध्या वार्षिक उलाढाल 7 ते 7.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इतरांनीही कृषी विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया उद्योगाची माहिती घेऊन आपला स्वतःचा उद्योग सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत पॉवर टिलर खरेदी करुन शेतीच्या मशागतीबरोबरच अनेक कामकाजासाठी पॉवर टिलरचा उपयोग होत आहे. शासनाच्या मदतीमुळे आर्थिक स्थैर्याबरोबरच पॉवर टिलर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे पन्हाळा तालुक्यातील हरपवडे गावचे शेतकरी दिलीप धोंडीराम चौगले यांनी व्यक्त केले.
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील शिवमुद्रा शेतकरी गटाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सामुहिक गट शेतीसाठी 1 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. दुर्गम गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीमध्ये नाचणीचे उत्पादन घेतले. तसेच नाचणीवर प्रक्रिया करुन वेगवेगळे उपपदार्थ तयार करुन त्याचे योग्य पध्दतीने वितरण करुन सर्व शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली, असल्याचे मत गटाचे अध्यक्ष गणपत शंकर पोवार यांनी व्यक्त केले.