महापौर फुटबॉल चषक स्पर्धा ५ ते १० मे दरम्यान
कोल्हापूर : ऐतिहासिक क्रीडा परंपरेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दि. ५ ते १० मे २०२६ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे पार पडणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीला भक्कम पाया घालून दिला. त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढी निरोगी, सक्षम व सशक्त व्हावी, तसेच पारंपरिक क्रीडांचा विकास व संवर्धन व्हावे या उद्देशाने विविध क्रीडा उपक्रमांना चालना देण्यात आली. याच परंपरेचा वारसा जपत फुटबॉलसारख्या खेळाला विशेष प्रोत्साहन मिळाले असून कोल्हापूरला स्वतंत्र क्रीडानगरी म्हणून ओळख मिळाली आहे.स्पर्धेचा उद्घाटन सामना दि. ५ मे रोजी दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या ‘ए’ डिव्हिजनमधील १६ नामांकित संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रुपये १ लाख ५० हजार व चषक, तर उपविजेत्या संघाला रुपये ७५ हजार व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलकीपर, डिफेन्स, हाफ, फॉरवर्ड आणि सर्वोत्तम खेळाडू यांना प्रत्येकी रुपये १०,००० व चषक देण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला रुपये २०,००० व चषक प्रदान केला जाईल. पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी रुपये १०,०००, तर दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघांना प्रत्येकी रुपये २०,००० बक्षीस दिले जाईल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी रुपये २०,००० देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला ट्रॅकसूट देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेदरम्यान सुरक्षा व्यवस्था म्हणून महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. तसेच आरोग्य विभागामार्फत अॅम्ब्युलन्स व फिजिओथेरपिस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे चित्रीकरण क्लोज सर्किट कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येणार आहे.























































