पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ५ नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ५ नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवणे व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकूण ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्ली (ता. कागल), प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरे (ता. शाहूवाडी), प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण (ता. आजरा), प्राथमिक आरोग्य केंद्र दानोळी (ता. शिरोळ), प्राथमिक आरोग्य केंद्र ठिपकुर्ली (ता. राधानगरी) यांचा समावेश आहे. या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार असून आरोग्य यंत्रणेची गतिशीलता वाढणार आहे.
या प्रसंगी खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, आरोग्य व बांधकाम सभापती सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, पंचायत समिती आजरा सभापती जयश्री गजानन गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे यांच्यासह इतर जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
























































