लोकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ४१५ लॅपटॉप व ९१ प्रिंटरचे वाटप

कोल्हापूर – प्रशासनाने लोकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी तत्पर असले पाहिजे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि डिजिटल साहित्य उपलब्ध करून दिले असून, आता प्रशासकीय गतिमानता उपक्रमांतर्गत सर्वांनी चांगल्या कामाचा संकल्प करावा. आपल्या कामाच्या गतीला आता तंत्रज्ञानाची जोड देऊन शासनाला अपेक्षित असलेले लोकाभिमुख काम पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून मंडळ अधिकारी, ग्राम महसूलअधिकाऱ्यांना ४१५ लॅपटॉप व ९१ प्रिंटरचे वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रातिनिधीक स्वरूपात सहा मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप संचाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले, तर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित खासदार शाहू छत्रपती यांनी नमूद केले की, संगणक आणि लॅपटॉपमुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढणार असून प्रत्येकाने प्रशिक्षण घेऊन दर्जेदार काम करावे. खासदार धैर्यशील माने यांनी तंत्रज्ञानाने परिपूर्ण प्रशासन गावागावापर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा एक वेगळा आदर्श निर्माण होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास आमदार अशोक माने, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आधुनिक उपकरणांमुळे महसूल विभागाचा कणा असलेल्या मंडल अधिकारी आणि तलाठी स्तरावरील कामकाजात मोठी सुसूत्रता येणार आहे. अशा प्रकारे, पायाभूत सुविधांच्या विस्तारासोबतच डिजिटल क्रांती घडवून महसूल विभागाला अधिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट यातून साध्य केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश महाडेश्वर यांनी केले. यावेळी महसूल संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.