लोकप्रतिनिधींची व ग्रामस्थांची मदत अन् ग्राहक प्रकाशात…
कोल्हापूर : वादळ, वारा, पाऊस, महापूर असो की कोरोना विजसेवेच्या कर्तव्यासाठी सदैव दक्ष आहोत, याची प्रचीती महावितरणच्या जनमित्रांनी नेहमीच दिली आहे. कोगे शाखेच्या जनमित्रांनी तीन तासांच्या मोहिमेत शर्थीचे प्रयत्न करून कसबा बीड सह सहा गावांतील सुमारे साडे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.
याकरिता लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मदत केली. महे गावठाण विद्युत फीडरचा जंप तुटून ताण दिलेल्या तारेला व फेज वायरला लागून ठिणगी उडून तो फीडर बंद झाला. त्यामुळे कसबा बीडसह सहा गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. दुथडी भरून वाहणाऱ्या तुळशी – भोगावती नदीचे पात्र ओलांडून वीज खांबावर चढून तो जंप जोडला. वीजसेवा पूर्ववत सुरू करून ग्राहकांना दिलासा दिला.
या कामी माजी पंचायत समिती सभापती श्री. राजकुमार सूर्यवंशी, निवास पाटील यांनी मदत केली. प्रशिक्षणार्थी शाखा अभियंता आकाश पुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनमित्र मच्छिंद्र वेदांते, अनिल चव्हाण, सुजित पाटील, रंगराव तळेकर, संग्राम भोसले, दिगंबर चौगुले यांनी ही कामगिरी केली. परिसरात जनमित्रांचे कौतुक होत आहे.