विनायक जितकर
राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत करण-विनयचे यश यड्राव : इलेक्ट्रिकल आभियांत्रिकचे विभागप्रमुख डॉ. के. हुसैन यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना विनय आणि करण.
कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘आधुनिक बैलगाडी’ला राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन 2023’ या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. शरद इंजिनिअरिंग कॉलेज, यड्राव येथे झालेल्या या स्पर्धेत इलेक्ट्रिकल विभागाचे विद्यार्थी विनय जाधव आणि करण पोवार यांना प्रथम क्रमांकाने सन्मानीत करण्यात आले.
या प्रोजेक्ट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी नवीन तांत्रिक संकल्पना सादर केल्या. यामध्ये विनय आणि करण यांनी ‘आधुनिक बैलगाडी’ ही संकल्पना सादर केली. या बैलगाडीमध्ये जीपीएस ट्रेकिंग सिस्टीम, ब्रेक सिस्टीम, आपत्कालीन इलेक्ट्रिकल मोटार, रोलर व्हील अशा अनेक सुविधा समाविष्ट केल्या होत्या.
बैलांचे हाल कमी करणे, प्राण्यांची जीवितहानी टाळणे, अपघात टाळणे, लोकेशनची माहिती मिळणे, आपत्कालीन स्थितीत लवकर मदत पोहोचवणे, वाहकाचे मनोरंजन, बॅटरी चार्जर अशी अनेक वैशिष्ट्ये या बैलगाडीत असल्याचे विनय व करणने सांगितले. |
राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी विनय जाधव आणि करण पोवार यांनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळात साखर कारखान्यानी अशाप्रकारच्या बैलगाडी निर्माण केल्यास नक्कीच अपघात विरहित ऊस वाहतूक आणखी जलद होईल असा विश्वास संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी व्यक्त केला. या प्रोजेक्ट संकल्पनेसाठी प्रा. अक्षय खामकर, पॉलिटेक्निक समन्वयिका प्रा. के. एम. पाटील, इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. डी. परमाज यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विनय व करणचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.