कोल्हापूर- राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरती संबंधीचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले शिक्षणाचे चक्र आता रुळावर आले आहे, अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे.
महिला बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची तसेच रिक्त जागांच्या भरतीसंबंधीची घोषणा केली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार असून या कर्मचाऱ्यांच्या सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील बालकांच्या बौद्धिक आणि शारीरिक पोषणाच्या दृष्टीने राज्य शासनाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील बालकांना व कुटुंबांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या दोन महिन्यांत राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहितीही राहूल चिकोडे यांनी दिली. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या सुमारे ६५ हजार रिक्त जागांपैकी ३० हजार जागा भरण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रियाही आता सरकारने मार्गी लावली आहे. याबरोबरच ७५ हजार जागांवरील नोकरभरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून सरकारने युवकांच्या रोजगाराच्या संधी अधिक विस्तारल्या आहेत. कोविडकाळात राज्यात दोन वर्षे भरती प्रक्रियाच बंद असल्यामुळे अनेक युवकांच्या नोकरीच्या संधी संकुचित झाल्या होत्या. या निर्णयामुळे लाखो बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यात 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे