सध्याच्या ढगफुटींमागे सौर वादळे… अक्षांश रेखांश वर याची रियल टाईम माहिती देता येणे शक्य…
नाशिक – शेतकरी व जनहितासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसाठी १८ एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कची आवश्यकता आहे. यामुळे महाराष्ट्रातील ४३ हजार ७२२ गावांतील कोट्यवधी लोकांना थेट मोबाईलवर ढगफुटी, गारपीट, किती मिलिमीटर पाऊस किती वाजता कोणत्या अक्षांश रेखांश वर होणार याची रियल टाईम माहिती देता येणे शक्य होईल.
महाराष्ट्रापेक्षा एक षष्टांश क्षेतफळाच्या हिमाचल प्रदेशला तीन एक्स बॅंड डॉप्लर रडार बसविले गेलेत. डॉप्लर रडार जे अगदी बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारमानात किती पाणी, बर्फ कण व बाष्प आहे याची माहिती देते. मान्सून पॅटर्नच्या रंगबदलाबरोबरच सौर वादळांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, वाशिम, हिंगोली, रत्नागिरी आदी विविध विभागातील विविध जिल्ह्यात फार मोठया संख्येने ढगफुटी होत आहेत. वातावरणातील अस्थिरतेने क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होत विजांचा गडगडाट व लखलखाटासह कमी कालावधीत ताशी १०० मिलीमीटर दराचा नुकसान करणारा घातक पाऊस होत आहे. कुठे ढगफुटीचे पूर (फ्लॅशफ्लड) तर कुठे गारपीट होत आहे.
असे असले तरी देशाच्या व महाराष्ट्राच्या इतर खूप मोठ्या भागात दुष्काळाने लोक होरपळून निघाले आहेत. मात शेतकऱ्यांनी घाबरून न जाता दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुयोग्य निर्णय घेत काळजी घ्यावी. असे आवाहन भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्सिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (आयआयटीएम) पुणे चे माजी शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ व हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.