मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे विहित वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन…
गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रकल्पामध्ये यावर्षी 40% पाणीसाठा करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर उपस्थित होते.
भुदरगड तालुक्यामध्ये सन 2021 साली मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी दसदृश्य पावसामुळे 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प अचानक फुटल्यामुळे मेघोली, तरकळवाडी, वेंगरूळ, नवले व ममदापूर या गावातील शेकडो एकर क्षेत्र खरबडून गेले. परिणामी या धरणफुटी दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने एक महिला मृत पावली, जनावरे मृत पावली, महावितरण चे खांब वाहून गेले, शेती खरबडून गेली, विहिरी मुजल्या तसेच हातात तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये सापडला होता. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तत्काळ मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली व सदरील प्रकल्प जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू करता आले आहे.
सध्या 60% काम पूर्ण झालेले आहे. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली गळती काढून प्रकल्पाची पुनर्बांधणी करण्याचे अवघड काम असल्यामुळे जलसंधारण विभाग व संबंधित ठेकेदार यांनी अगदी विहित वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
आज प्रकल्प स्थळी भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पाची महत्त्वाचा भाग असणाऱ्या गेट व सुरू असलेल्या कामाची पाहणी यावेळी केली. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा करण्याची नियोजन असून पावसाळा संपल्यानंतर प्रकल्पाचे उर्वरित काम जलद गतीने हाती घेण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवून अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) करून पाणी जास्तीत जास्त क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याची नियोजन करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच लाभ क्षेत्रामध्ये सध्या 11 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या याबाबतही तात्काळ दुरुस्ती प्रस्ताव तयार करून सर्व केटीवेअर दुरुस्त करण्याची सूचना केली. तसेच आणखी 3 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली त्याबाबतही पुढील 15 दिवसांमध्ये सर्वेक्षण करावे यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंधारण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर, माजी सभापती बाबा नांदेकर, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर, संजय देसाई, सयाजी राऊळ, दशरथ राऊळ, सरपंच प्रवीण राऊळ, संभाजी तळकर, नामदेव महाडिक, तुकाराम कोटकर, संजय तळकर, वेंगरूळ गावचे सरपंच प्रशांत देसाई, सुभाष देसाई,शिवाजी देसाई,धनाजी गुरव यांचे सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, जलसंधारण विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.