शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान
कोल्हापूर – शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि संस्थात्मक विकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला क्यूएस आय- गेज गोल्ड हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे संस्थेच्या गुणवत्ता वृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. गुजरातमधील द लीला गांधीनगर येथे झालेल्या विशेष समारंभात महाविद्यालयाला या मानांकनाने सन्मानित करण्यात आले. गुजरातचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अर्जुनभाई देवाभाई मोढवाडिया यांच्या हस्ते डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे आणि अधिष्ठाता (क्वालिटी ॲश्यूरन्स) डॉ. एस. डी. भोपळे यांनी हा बहुमान स्वीकारला.
‘क्यूएस आय- गेज’ ही भारतातील महाविद्यालये व विद्यापीठांच्या गुणवत्तेचे सर्वांगीण मूल्यमापन करणारी स्वतंत्र उच्च शिक्षण रेटिंग प्रणाली आहे. भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करून हि रेटिंग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने पुराव्यांवर आधारित आणि सर्वांगीण गुणवत्ता विचारात घेऊन संस्थांचे मूल्यमापन केले जाते. केवळ शैक्षणिक निकाल किंवा संशोधन यापुरताच विचार न करता संस्थेची एकूण गुणवत्ता आणि कार्यक्षमता तपासली जाते. यामध्ये अध्यापन व अध्ययन, प्राध्यापकांची गुणवत्ता, रोजगारक्षमता, विद्यार्थी विविधता, सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व, मान्यता, संशोधन, नवोपक्रम, आंतरराष्ट्रीयीकरण तसेच प्रशासन व संस्थात्मक रचना यांसारख्या विविध बाबींचा विचार केला जातो.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, हे मानांकन म्हणजे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीची पावती आहे. सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. भविष्यातही जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि नवउपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालय प्रगतीची नवी शिखरे गाठेल याची खात्री आहे.
विश्वस्त ऋतुराज एस. पाटील म्हणाले, महाविद्यालयाला मिळलेल्या क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनामुळे भविष्यातील अधिक मोठ्या ध्येयांसाठी प्रेरणा मिळेल, यापुढेही महाविद्यालयाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य अभियांत्रिकी संस्था बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या बदलत्या संधींसाठी सक्षम बनवण्यावर आमचा नेहमीचा भर राहील.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि गुणवत्ता वृद्धीसाठीची प्रेरणा तसेच विश्वस्त ऋतुराज एस. पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि सर्वांगीण विकासासाठी दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्य यामुळे हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळवण्यात यश मिळाले आहे. यापुढेही गुणवत्तेचे नवे टप्पे प्राप्त करण्यासाठी आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील राहतील. कसबा बावडा- डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेल्या ‘क्यूएस आय- गेज गोल्ड’ मानांकन प्रमाणपत्र डॉ. संजय डी पाटील व सौ पूजा ऋतुराज पाटील यांना सादर करताना डॉ. संतोष चेडे. समवेत डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. एस. डी. भोपळे आदी.











































































