एआयमुळे ४० टक्के उत्पादन वाढ आणि २५ टक्के कमी संसाधन वापर शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

नाशिक – कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवणे आणि संसाधनांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करणे शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मविप्रच्या कृषी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाधारित आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांनी शेतीमध्ये एआयचा वापर करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. मविप्रने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारलेले हे कृषी महाविद्यालय येत्या काळात केवळ नाशिक जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रमुख आणि अग्रगण्य शेती संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील १२८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या आणि मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते.

यावेळी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह आमदार डॉ. राहुल आहेर, दिलीप बनकर, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, गोकुळ गिते, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या उद्घाटन सोहळ्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) चे समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मविप्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कर्मवीरांच्या त्यागातून आणि अनेक समाजधुरीणांच्या अविरत परिश्रमातून ११२ वर्षांपूर्वी उभी राहिलेली मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आज राज्यातील एक अग्रणी आणि सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी, ११ हजारांहून अधिक शिक्षक आणि विशाल कर्मचारी वर्गासह एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. नाशिक जिल्ह्यात संस्थेने उभारलेल्या व्यापक विस्तारामुळे जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने विकसित केलेल्या ‘महाविस्तार ॲप’च्या उपयुक्ततेचा पुनरुच्चार केला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टॉलवर प्रदर्शित केलेले अन्नप्रक्रिया पदार्थ आणि नवसंशोधनावर आधारित प्रयोग भावी कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक असल्याचे सांगत, अशा उपक्रमांमुळे आजचा तरुण वर्ग आत्मविश्वासाने पुन्हा शेती व्यवसायाकडे आकर्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मविप्र संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना राज्य सरकारचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहील तसेच संस्थेला आवश्यक ती मदत सरकार देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, आधुनिक अवजारे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळण्याचीही गरज आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करून शेतीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नाशिक जिल्ह्याने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून कांदा उत्पादनासह देशाच्या द्राक्ष निर्यातीत नाशिकचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. शेतीमालाचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी १,१०० कोटी रुपये वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या मविप्र संस्थेची माहिती देत प्रास्ताविक केले. संस्थेला राजाश्रय लाभला असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या पायाभरणीत आणि उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व कर्मवीरांचे स्मरण करून त्यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला. डॉ. भास्कर ढोके यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी आभार व्यक्त केले. दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मविप्र रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी : पालकमंत्री गिरीश महाजन

कार्यक्रमाचे अध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मविप्र संस्थेचे कौतुक केले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन संस्थेच्या वाढीसाठी सर्वांनी एकोप्याने काम केल्याचे सांगत हे कृषी महाविद्यालय म्हणजे शिक्षण चळवळीतील नवा अध्याय असून कृषी क्षेत्राला नवी भरारी देणारे आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, नवनवीन तंत्रज्ञान तसेच आयात-निर्यात विषयक शिक्षण मिळून शेतीला नवी चालना मिळेल. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवून शेतकरी रोजगार निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्रासाठी हे नवीन दालन झाल्याचा आम्हाला अभिमान आहे.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविक येणार असून, प्रशासनाला मविप्र संस्थेची मोठी मदत लागणार आहे. फायर स्टेशनसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मविप्रने दोन एकर जागा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि आवश्यक टीडीआर दिला जाईल, अशी सूचना केली.

तसेच, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या भाडे कराराच्या मुदतवाढीचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी मार्गी लावला असल्याची घोषणा त्यांनी केली. संस्थेचा करार जुना असल्याने नवीन आदेश या कराराला लागू होत नाहीत. त्यामुळे ती ५० एकर जागा जुन्या कराराप्रमाणेच अवघ्या एक रुपया भाड्याने संस्थेला वापरता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने मविप्रला शतकोत्तर प्रोत्साहन निधी द्यावा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे

यानंतर संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि विशेषतः कर्मवीर बाबुराव ठाकरे प्लेसमेंट सेलच्या कामगिरीचा आढावा सादर केला. मविप्रची सर्वसमावेशक ५१२ शाखा असून शिक्षण, आरोग्य व रोजगार या तीन क्षेत्रांत सामाजिक बांधिलकीतून संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आतापर्यंत सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. जिल्हा न्यायालयाच्या भव्य वास्तूच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे योगदान राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या कारकीर्दीचा गौरव करत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या मांडल्या. यामध्ये रावसाहेब थोरात यांच्यावरील धडा शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे, भागशाळेसाठी स्वतंत्र शाळा मंजूर करणे, टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारणे, कृषी विज्ञान केंद्र मंजूर करणे तसेच संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्रामीण शाळांच्या इमारतींसाठी १०० कोटी रुपये शतकोत्तर प्रोत्साहन निधी मंजूर करणे या मागण्यांचा समावेश होता. राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

‘मविप्र’तर्फे २५ लाखांचा ‘सीएम रिलिफ फंड’

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मविप्र संस्थेकडून मुख्यमंत्र्यांकडे २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते मविप्र कर्मवीर पत्रिकेच्या ‘रोजगार’ विषयावरील अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.