आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ. हसमत हवेरी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा 

कोल्हापूर – आधुनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची खरी सेवा आहे. परिचारिकांनी संवेदनशीलता, संयम आणि समर्पणाच्या भावनेतून कार्य करत समाजाच्या आरोग्यव्यवस्थेला बळ द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ.हसमत हवेरी यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिग मध्ये मंगळवार, दि. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. सौ. हसमत हवेरी यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका मिस.फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या कार्याचा आढावा घेत परिचारिका क्षेत्रातील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. परिचारिका या रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतात. कोविडसारख्या संकट काळात परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता दिलेली सेवा संपूर्ण समाज कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.

तसेच आजच्या काळात नर्सिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले. कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारत आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. नर्सेसशिवाय कोणतेही हॉस्पिटल प्रभावीपणे चालू शकत नाही. उपचार प्रक्रियेतील त्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असे त्यांनी नमूद केले

प्राचार्य डॉ. उमारणी जे म्हणाल्या, नर्सेस केवळ रुग्णालयात सेवा देत नाहीत, तर देशनिर्मितीतही त्यांचा मोठा वाटा आहे. रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज नर्सिंग क्षेत्र हे ‘व्हॅल्युएबल इन्व्हेस्टमेंट’ म्हणून उदयास येत आहे, असे सांगितले. उपप्राचार्या एम. बिजापूर यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रेड रिबीन उपक्रमांतर्गत आयोजित रॅली, रोल प्ले आणि पोस्टर स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सुनील आवटे, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच नर्सिंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.