शासकीय सेवेत विविध पदांवर निवड झालेल्या 67 गुणवंतांचा सत्कार…
कोल्हापूर – शासकीय सेवेत आल्यानंतर आपण लोकांसाठी आहोत ही भावना ठेवून घटनेला अभिप्रेत काम जबाबदारीने करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. शासकीय सेवेत निवड झालेल्या ६७ गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दल तसेच न्यायाधीश, इंडियन आर्मी, नेव्ही, बीआरओ, बीएसएफ, मंत्रालय सहाय्यक, हायकोर्ट क्लर्क अशा विविध शासकीय पदावर निवड झालेल्या ६७ उमेदवारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन अजिंक्यतारा कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी निवड झालेले गुणवंत व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही ही दोन चाके व्यवस्थित चालली तरच देशाची प्रगती वेगाने होईल. शासकीय काम करून घेताना आपल्याला जो त्रास झाला तो त्रास आपल्यामुळे इतरांना होणार नाही याची काळजी सतत घ्या. राज्याच्या हितासाठी जे काही चांगले करता येईल ते या पदाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत निवड होण्यासाठी जी कौशल्य वापरली ती कौशल्ये वापरून लोकांची जास्तीत जास्त सेवा होईल यासाठी कार्यरत राहा. प्रामाणिक हेतू ठेवून चांगल्या कामासाठी सतत प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकामध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. आपल्या मातीतील मुलानी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य उत्तम पद्धतीने आपल्या हातून घडावे अशा शुभेच्छा दिल्या. पोलीस दलात निवड झालेली धनश्री सुतार, गणेश कापसे, अमित वाले, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये निवड झालेल्या उदय अण्णासाहेब पाटील, बीएसएफमध्ये निवड झालेल्या प्रतीक परीट यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.