विनायक जितकर
गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने करण्याच्या सूचना….
कोल्हापूर – गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करा. ठेकेदार कंपनीकडून सुरु असलेला चालढकलपणा खपवून घेतला जाणार नाही. वर्क ऑर्डर मिळूनही ६ महिने झाले तरी जॅकवेलचे काम का पूर्ण झाले नाही असा सवाल करत कामाचे योग्य नियोजन करून त्याचा दैनंदिन अहवाल देण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजने संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३४४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे संबंधित शासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, १३ गावांच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान देणारी ही नळ पाणीपुरवठा योजना असल्याने त्याचे काम उत्कृष्ट आणि निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेच असल्याचे सांगितले. योजनेचे काम मुदतीमध्ये पूर्ण करण्यासाठी गतीने काम सुरू ठेवण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यानी देखील या योजनेच्या कामाबाबत दक्ष राहावे. यावेळी स्थनिक पातळीवरील समस्याबाबत, आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत या बैठकीतून दूरध्वनी वरून चर्चा केली. ज्या ठिकाणी, पाईपलाईन आणि पाण्याची टाकी उभा करण्याकरिता जमीन संपादित करावी लागणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाना तातडीने मंजुरी देण्याबाबतही आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ही 13 गावे असणार नळ पाणी पुरवठा योजनेत… गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कणेरी, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे, गोकुळ शिरगाव, कंदलगाव. |
या मंजूर योजनेचा आराखडा तयार असून मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला नोव्हेंबर मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून हे काम पूर्ण का झाले नाही? गेले ६ महिने काय करत होता असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी ठेकेदार कंपनीची कानउघाडणी केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने प्राधान्याने खुदाईची कामे तसचं 15 जून पर्यंत जॅकवेलच्या खुदाईचे काम पूर्ण करा, त्यासाठी मनुष्यबळ वाढवा अशा त्यांनी सूचना केल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी, योजनेच्या कामांचा बार चार्ट द्या, आणखी किती टीम वाढवणार याची माहिती देण्याच्या सूचना मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे असिस्टंट जनरल मॅनेजर पवन कुमार यांना केल्या.
या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, करवीरचे गट विकास अधिकारी विजय यादव, उपअभियंता डी के पाटील, प्रभाकर गायकवाड, मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे असिस्टंट जनरल मॅनेजर पवन कुमार, व्यवस्थापक नितीन माने उपस्थित होते.