गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेले समाजोपयोगी उपक्रम घराघरात पोहचवणं ही बूथप्रमुखांची जबाबदारी – खासदार धनंजय महाडिक यांची कार्यकर्त्यांना सूचना…
कोल्हापूर – सध्याच्या काळात कोणत्याही निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे बूथ यंत्रणा सक्षम केली पाहिजे. बूथ यंत्रणा हा निवडणुकीचा आत्मा असून, मंडल प्रमुख आणि बूथ प्रमुखांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. बूथ सक्षम करायचा असेल, तर एकेक घर आपलेसे करावे लागेल. त्यासाठी आपल्या हृदयातील कार्यकर्ता जागृत ठेवा, असे आवाहन राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी केले. कार्यकर्त्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली पाहिजे, असे मत, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक, आज शाहू स्मारक भवनमध्ये झाली. या बैठकीला राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, विजय जाधव, डॉ. संजय पाटील, अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण सरचिटणीस सुनील मगदूम यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. राहुल चिकोडे यांनी प्रास्ताविकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ९ वर्षात केलेली कामं जनतेपर्यंत नेण्याचे काम करावे लागणार आहे, असे सांगितले. तर राज्य सरकारने गेल्या १० महिन्यात केलेल्या कामांचा आढावा महेश जाधव यांनी घेतला.
शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या १० महिन्यात समाजातील प्रत्येक घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यासह सर्व घटकांचे समाधान करणारा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर करुन, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, नामदार खाडे यांच्या हस्ते माजी आमदार अमल महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. सध्याच्या काळात कोणत्याही निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. बूथ यंत्रणा सक्षम झाली, तर निवडणूक जिंकता येते. २०१९ च्या निवडणुकीत आपण केवळ बूथ यंत्रणेमुळे ३७ हजार मतांनी निवडून आलो, असे नामदार सुरेश खाडे यांनी सांगितले. निवडणुका जिंकण्याचा मार्ग दाखवणारी बूथ यंत्रणा हा निवडणुकीचा खरा आत्मा आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले. आपल्या हृदयातला कार्यकर्ता बूथ प्रमुखांनी नेहमीच जिवंत ठेवला पाहिजे. शासन योजनेचे लाभार्थी असणार्या प्रत्येक घरात जाऊन बूथ प्रमुखांनी त्याची माहिती दिली पाहिजे. शक्ती प्रमुखांनी जे कार्यक्रम दिलेत, ते तंतोतंत पाळायचा प्रयत्न केला पाहिजे, असे नामदार खाडे यांनी नमूद केले. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, ही खंत आहे. ती खंत या निवडणुकांमध्ये भरुन काढली पाहिजे, असेही नामदार खाडे म्हणाले.
मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी ऍट द रेट-९, या कार्यक्रमाची रचना केली आहे. कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात काय केले हे सांगितले पाहिजे. त्यासाठी मंडल प्रमुखांनी बैठका घ्यायच्या आहेत, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात जे उपक्रम राबवले, तसेच राज्य सरकारने गेल्या १० महिन्यात ज्या लोकोपयोगी योजना राबवल्या, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मंडल आणि बूथ प्रमुखांनी घ्यावी. प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक हजार लोकांना जाऊन भेटले पाहिजे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवली जाणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. बूथ सक्षमीकरण अभियान कार्यक्रम पक्षाकडून आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बूथ प्रमुखांची आहे, असे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी नमूद केले. पुढच्या काळात प्रत्येकाला जबाबदारी दिली जाईल. कोल्हापूर जिल्हयातून किमान ६ आमदार भाजपचे निवडून येतील, यादृष्टीनं कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे, असे घाटगे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे मंडल प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.