१५ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार जल व्यवस्थापन कृती पंधरवडा…
कोल्हापूर – कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर मार्फत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे) यांच्या संकल्पनेतून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ चा मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शाहूजी सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.
जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सिंचन व्यवस्था, कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहभाग घेण्यात येणार आहे.
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या गोष्टी प्राधान्याने करण्यात येणार आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली आहे.