उसात लपवला; २१ किलो गांज्यासह ७५ वर्षीय शेतकरी अटकेत VIDEO बघा
कोल्हापूर : मुरगूड पोलिस ठाणे हद्दीतील माद्याळ गावात उसाच्या शेतात लपवून ठेवलेला २१ किलो ९५७ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, ७५ वर्षीय शेतकरी अटकेत आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख २० हजार ५७० रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (१५ एप्रिल) माद्याळ येथील कोंडार भागात छापा टाकला. या वेळी शेताच्या मधोमध गांजाची झाडे सापडली. पोलिसांनी शेतकरी दिनकर कृष्णा राणे (रा. माद्याळ, वय ७५) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतात गांजाची लागवड सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खडबडून उठत तपासाला गती दिली. पोलिसांच्या छाप्यात गांजाची झाडे, साठवलेला ओला गांजा आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे २ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने आणि कर्मचारी यांनी एकत्रित केली. पुढील तपास मुरगूड पोलिस करत आहेत.