रोटरी क्लब ऑफ शिरोलीच्या व्होकेशनल पुरस्कारने आर्थिक सल्लागार अनिल पाटील यांचा गौरव…
कोल्हापूर – रोटरी क्लब एमआयडीसी शिरोली या क्लबचा ४१ वा वाढदिवस १६ जूनला उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या ४१ वर्षांत खूप समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. क्लबच्या वतीने कायमस्वरूपी उपक्रम म्हणून फिजिओथेरपी सेंटर कोरगावकर कंपाऊंड टाकाळा येथे नियमितपणे चालू आहे. याचा हजारो लोकांनी लाभ घेतला आहे. अल्पशा दरात गरजूंना फिजिओथेरपी सेवा आजही मिळत आहे. समाजात उत्कृष्टपणे काम करणार्या व्यक्तींचा व्होकेशनल अवॉर्ड देऊन या कार्यक्रमात यांचा सत्कार करण्यात आला. क्लबच्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपचार देणार्या डॉ. मुग्धा पाटील यांनाही हा अवॉर्ड देण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये आर्थिक क्षेत्रात काम करणारे, एस. पी. वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांचा रोटरी क्लब ऑफ शिरोलीच्या व्होकेशनल अवॉर्डने गौरव करण्यात आला.
आर्थिक निरक्षरता हा राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. म्हणून रोटरीच्या व्यवस्थापनकडून आर्थिक साक्षरतेचे अनेक उपक्रम राबविले जातात. श्री. पाटील गेल्या ३० वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. आर्थिक साक्षरतेची मोहीम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अथकपणे प्रयत्न करीत आहेत. आर्थिक साक्षरतेचे विविध लेख विविध दैनिकांत प्रसिद्ध झाले आहेत. अनेक ठिकाणी २०० हून अधिक कार्यशाळा, मार्गदर्शन, सेमिनार घेतले आहेत. आर्थिक साक्षतेच्या माध्यमातून गुंतवणूक आणि बचतीचे महत्त्व पटवून देऊन कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा मांडावा, याचे ज्ञान २००० कुटुंबांपर्यंत पोहोचविले आहे.
सध्याच्या काळात फसवणुकीच्या अनेक घटना पाहावयास मिळत आहेत. आर्थिक फसवणूक होऊ नये व योग्य ठिकाणी गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी आज आर्थिक साक्षर होणे गरजेचे. त्या दृष्टीने श्री. पाटील यांचे कार्य मोलाचे ठरत आहे. याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लब वतीने अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. पाटील यांना व्होकेशनल अवॉर्ड पुरस्कार पीडीजी रोटेरियन संग्राम पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पीडीजी मोहन मुल्हेरकर, एजी सुभाष कुत्ते, रोटरी क्लब ऑफ शिरोलीचे अध्यक्ष बळिराम वराडे, सचिव संजोय संकपाळ, सौ. वैशाली पाटील यांच्यासह रोटरीचे मेंबर्स व कुटुंबवर्ग उपस्थित होते. मोठय़ा उत्साहात चार्टर नाईट कार्यक्रम पार पाडला.