अरविंद जाधव
महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्रा वर दुष्काळाचे सावट…
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी तसेच कर्नाटक आंध्राची वरदायनी ठरलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील चिंताजनक वातावरण केले आहे. जून महिना सुरु होऊन 20 दिवस झाले तरी मान्सूनचा अद्याप थांगपत्ता नाही. मान्सूनच्या बाबतीत हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच ठरत आहेत. निम्म्या महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेशची तहान भागविणारे कोयना धरण तळ गाठत आहे. एकूण 105 टी.एम.सी. पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणात केवळ 10.48 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यापैकी केवळ 5.33 टी.एम.सी. पाणी साठा उपयुक्त आहे तर 5.15 टी.एम.सी. पाणीसाठा हा मृत असतो ज्याचा वापर करता येणार नाही. येत्या पुढील काही दिवसात मान्सूनचा पाऊसाला सुरवात झाली नाही तर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
मागील वर्षी च्या तुलनेत चालू वर्षी 20 जूनला कोयना धरणात केवळ 10.48 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे ही बाब चिंताजनक आहे. उपलब्ध 10.48 टी.म.सी. पैकी 5.15 टी.एम.सी पाणीसाठा हा मृत स्वरुपातील आहे. ज्याचा वापर करता येणार नाही. तर वापरासाठी केवळ 5.33 टी एम.सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाची तीव्रता वाढत आसताना दिवसेंदिवस पाण्याचीही मागणी वाढत आहे. पिण्यासाठी व सिंचनासाठी धरण पायथा के.डी.पी.एच मधून नदीपात्रात 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुढील शक्यतेची गंभीरता लक्षात घेत कोयना धरण व्यवस्थापनाने पिण्याचे पाणी तसेच सिंचन यामध्ये मोठी कपात केली आहे. धरणातील पाणीपातळी दिवसांदिवस खालावत जात आहे.
कोयना जलाशयातील चित्र सध्या एखाद्या वाळवंटागत दिसत असून कोयना धरणासाठी संपादन केलेल्या अनेक गावांचे स्मृतीशेष हे आता उघड्यावर आले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पर्जन्यमानात अव्वल असणाऱ्या सातारा जिल्ह्यामधील ही स्थिती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची स्थिती दर्शवते. पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणावर अवलंबून असलेल्या निम्म्या महाराष्ट्रसह, कर्नाटक, आंध्रप्रदेशची आता चिंता वाढली आहे. हवामान खात्याने 23 ते 28 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे जर हे अंदाज चुकले तर महाराष्ट्रासह इतर राज्यांवर दुष्काळाचे मोठे सावट निश्चित आहे.