विनायक जितकर
कदमवाडी येथे योग प्रात्यक्षिके करताना अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी…
कसबा बावडा – डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजच्या शरीरक्रिया शास्त्र विभागातर्फे बुधवारी ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका सौ. अस्मिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. शरीरक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पद्मजा देसाई यांनी योगदिन साजरा करण्यामागील उद्देश सांगून योगाचे महत्व विषद केले. ‘वसुधैव कुटुंबमसाठी योगा’ या थीमवर यावर्षीचा योग दिन साजरा केला जात असल्याचे त्यानी सांगितले.
डी. वाय. पाटील आभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, योगासन ही आपली जीवनशैली असून निरोगी शरीरासाठी ती प्रत्येकाने आचरणात आणावी. प्राचीन भारतीय परंपरा असलेल्या योगामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक फायदेही होतात. योगसाधनेमुळे सकारात्मक उर्जा मिळते, त्यामुळे प्रत्येकाने दिवसाची सुरुवात योगाने करावी, असे आवाहन त्यानी केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील, मेडिकल व फ़िजिओथेरपी कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.