कोल्हापूरः जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३’ नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ९२ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे.
अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामार्फत हा निर्देशांक सन २०२१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी या यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. सन २०२१मध्ये ४८, सन २०२२ मध्ये ८० आणि आता सन २०२३मध्ये ९२ अशा चढत्या क्रमाने विद्यापीठातील संशोधकांची या यादीमधील संख्या वाढत राहिली आहे. या वर्षीच्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा कला, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखांकडील ८ संशोधकांना स्थान प्राप्त झाले आहे.
अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. जगभरातल्या २१,४३९ शैक्षणिक संस्थांमधील १३,४५,१८६ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेश या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२३’ जाहीर करण्यात आले आहे.
अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये ‘अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ९२ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले आहेत. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान कायम राखले आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत अखंडित संशोधन सुरू असून त्याचे हे फलित आहे. ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’मध्ये संशोधकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत यंदा प्रथमच सामाजिक विज्ञान, भाषा या विषयांतील शिक्षकांचा समावेश झाला आहे. यापुढील काळातही विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक आपले संशोधनकार्य जोमाने करीत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘शिवाजी द ग्रेट’ या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’