लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय? – खासदार सुप्रियाताई सुळे
मुंबई – लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी विनंतीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.