विनायक जितकर
आळंदीतील घटनेवर ‘आप’ची मागणी…
कोल्हापूर – आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांनी विद्यार्थी वारकऱ्यांवर लाठीमार व धक्काबुक्की केली. अशा प्रकारच्या धक्काबुक्कीमुळे तीनशेहून अधिक वर्षे सुरु असलेल्या वैष्णव परंपरेला गालबोट लागले. प्रशासनाने केलेल्या लाठीमाराचा आम आदमी पार्टीने निषेध केला.
पोलिसांनी वारकऱ्यांना दिलेल्या वागणुकीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणता प्रकार झालाच नसल्याचे जाहीर करून टाकले. ही फक्त सारवासारव असून गृह खात्याचे अपयश लपवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे ‘आप’ जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी सांगितले. वारकरी विद्यार्थांवर झालेल्या लाठीमारामुळे काहीजण जखमी झाले. वारीत साप सोडण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करून 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण केला होता. वारी आणि वारकऱ्यांबद्दल फडणवीस आकास बाळगतात हे या घटनांवरून स्पष्ट होते. संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांना त्रास देणाऱ्या मानसिकतेचे सरकार आज राज्यातील सत्तेत आहे.
घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी ‘आप’चे जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर संघटक सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.