गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता तरी मार्गी लागेल का असा प्रश्न वाहनधारकासह प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून बांबवडे ची ओळख आहे सुमारे 30 ते 35 खेडेगावांचा या बाजारपेठेशी दररोज संपर्क येत असतो. त्याशिवाय कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग बांबवडे बाजारपेठेतून जातो त्यामुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील नगण्य आहे. तसेच शाहूवाडी तालुक्यातील आंबा विशाळगड पावनखिंड ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटक सुद्धा येत असतात परंतु बांबवडे या ठिकाणी वाहतुकीचे नियोजनच नसल्याने त्याचा त्रास मात्र वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन वर्षात तरी वाहतूक कोंडी वर मार्ग सापडेल का असा प्रश्न वाहनधारकासह सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.